adsense

शाहू महाराज यांची माहिती : Shahu Maharaj Biography in Marathi

राजश्री छत्रपती शाहू महाराज

राजश्री शाहू महाराज हे भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.  महाराष्ट्राला तीन महान समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.


Shahu maharaj information
Shahu Maharaj Information in Marathi

◆ जीवन

राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून इ.स. 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते.  त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. 

अभ्यास व शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. शिक्षण चालू असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय 17 वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय 12 वर्षांहून कमी होते. 2 एप्रिल 1895 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. 1922 सालापर्यंत म्हणजे 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. 


◆ शैक्षणिक कार्य

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना 1 रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली.

शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "अखिल भारताचे पुढारी" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित ( SC, ST, OBC ) समाजाचे नेतृत्व करावं असे आवाहनही महाराजांनी केले.


◆ जातीभेद निर्मुलन

जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत 1919 मध्ये बंद केली. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला.

जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ 100 मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली.


◆ बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य

बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. 1916 साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली.

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला.  वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट व ’‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष दिले. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले.


◆ कलेला आश्रय

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.


◆ शाहू महाराजांचे निधन

आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी उपेक्षित वंचित बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्य केले. अशा या लोककल्याणकारी राज्याचे 6 मे 1922 मुंबई येथे निधन झाले.