मदर टेरेसा
![]() |
Mother Teresa Mahiti |
कलकत्त्याच्या एका रस्त्यावरून एक विदेशी स्त्री चालली होती. तिच्याबरोबर तिच्या दोन सहकारी स्त्रियाही होत्या. पोशाखावरून ती स्त्री सेवाव्रत स्वीकारलेली धर्मप्रचारिका वाटत होती. रस्त्याच्या कडेला एक माणूस असहाय अवस्थेत पडला होता, जाणाऱ्या येणाऱ्यांना त्याच्याकडे पाहायलाही सवड नव्हती. तो आता फार थोड्या तासांचा सोबती होता. त्या स्त्रीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले. त्याचे अंग पुसले. त्याला स्वच्छ कपडे घातले. मरण्यापूर्वी मिळालेल्या या वागणुकीने त्याचा चेहरा उजळला. तेव्हा ती स्त्री आपल्या साथीदार स्त्रियांना म्हणाली, " मरताना त्याला जर जाणवले की, आपले कोणी तरी आहे तर त्याचे मरण सुखाचे होईल.'
एका भिकान्याचा एवढा विचार करणारी ही जगावेगळी आई म्हणजे 'मदर टेरेसा' होय. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना आपल्या जीवनध्येयाचा साक्षात्कार झाला; तेव्हाच त्यांनी स्वतःला गरिबांच्या सेवेसाठी वाहून घ्यायचे ठरवले. अठराव्या वर्षी त्यांनी धर्मप्रचारिकेची दीक्षा घेतली व घर सोडले. १९३१ साली दार्जिलिंग येथे त्यांनी सेवेची व धर्मप्रचाराची शपथ घेतली व १९३९ साली त्यांनी कलकत्त्यात आपल्या कामाला सुरवात केली. आजतागायत त्यांचे हे कार्य अखंड चालू आहे. १० सप्टेंबर १९४६ नंतर त्यांनी झोपडपट्टीतील दीनदुबळे व गरीब यांच्यासाठी आपले आयुष्य वेचण्याचे ठरवले व लाखो अनाथांच्या, अपंगांच्या सर्वार्थाने 'मदर' झाल्या.
मदर टेरेसांच्या या सेवेचे मोल जगाला उमगले आणि १९७९ साली त्यांना 'शांततेचे नेबेल पारितोषिक मिळाले. ती संपूर्ण रक्कमही त्यांनी गरिबांसाठीच खर्चण्याचे ठरवले. भारतानेही 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. मदर टेरेसा म्हणजे साक्षात प्रेम आणि मूर्तिमंत करुणा होय.