adsense

लोकप्रिय क्रिकेटवीर - सुनील गावस्कर : Sunil Gavaskar Biography in Marathi

सुनील गावस्कर 


sunil gavaskar mahiiti
Sunil Gavaskar information in marathi


            अगदी लहान वयात लोकप्रियता मिळवण्याचे भाग्य फारच थोड्यांच्या वाट्याला येते. सुनील गावस्कर हा त्यांपैकीच एक भाग्यवान क्रिकेटपटू आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात क्रिकेटचा सामना चालू होता. नभोवाणीवर क्रिकेटच्या खेळाचे धावते समालोचन चालू होते. हजारो मैलांपलीकडे दृष्टिआड खेळ चालला होता तरी लाखो लोकांची नजर त्या खेळावरच होती. त्या सर्वांच्या तोंडी एकच नाव होते 'सुनील गावस्कर !"

           
            आज सर्व खेळांत क्रिकेटचा खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहे. या खेळात इंग्लंडवर मात करून आलेला भारताचा संघ सर्वांत लोकप्रिय झाला होता आणि त्या संघात सुनील गावस्कर याला सर्वांत अधिक लोकप्रियता मिळाली होती.


             क्रिकेट हा सुनीलचा अगदी लहानपणापासून आवडता खेळ. अगदी लहान असताना तो आपल्या वडलांबरोबर क्रिकेटचा खेळ पाहायला जात असे. तेव्हाही चेंडू फेकण्यासाठी, पकडण्यासाठी त्याची धावपळ असे. सुनीलचे मामा माधव मंत्री यांच्याकडून त्याला शालेय जीवनातच या खेळाचे योग्य मार्गदर्शन लाभले. त्यामुळे सुनीलचा खेळ अतिशय शास्त्रशुद्ध झाला. आपल्या खेळाने सुनीलने आपल्या शाळेला आणि महाविद्यालयाला अनेक विजय मिळवून दिले.


             भारताच्या क्रिकेट संघात नेहमी आघाडीच्या फलंदाजांची उणीव भासत असे. उंचीने कमी पण अंगाने बळकट असलेल्या सुनीलने ही उणीव भरून काढली. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्याचे नाव दिगंतात गाजले. शतक आणि द्विशतक रचून त्याने सोबर्सच्या संघास सळो की पळो करून सोडले. त्यामुळे इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर त्याला पाहायला तुफान गर्दी झाली होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशीही वीस हजार प्रेक्षक हजर होते. टेलिव्हिजनचे कॅमेरे त्याच्यावर रोखले होते. वेगवान गोलंदाजी करणारा इंग्लंडचा स्नो आणि निर्भयपणे व आत्मविश्वासाने त्याला तोंड देणारा सुनील गावस्कर यांचा खेळ पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सुनीलचा खेळ पाहून जुन्या क्रिकेटप्रेमीना विजय मर्चंट यांच्या खेळाची आठवण झाली.


              सुनीलच्या या खेळाचे चीज झाले. विश्वसंघात त्याची निवड झाली. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुराही त्याने अनेकदा समर्थपणे सांभाळली आहे. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षा त्याने पूर्ण केल्या. तंत्रशुद्ध खेळ कसा असतो याचा अतुपाठ म्हणजे सुनीलचा खेळ. सुनीलने आपल्या खेळात अनेक विक्रम प्रस्थापित केले. आज सुनीलने या खेळातून निवृत्ती स्वीकारली असली, तरी आजही जगातील क्रिकेटच्या क्षेत्रात सुनील गावस्करचा शब्द प्रमाण मानला जातो.