एका समाजसेवकाचे मनोगत
'मुलांनो, आज या समारंभात तुम्ही मला बोलावलेत, अध्यक्षस्थान दिलेत आणि माझे जीवनकार्य, माझे मनोगत ऐकण्याची इच्छा व्यक्त केलीत म्हणून मी तुम्हांला थोडक्यात माझे मनोगत सांगतो. तुम्हांला आता माझी ओळख करून देताना तुमच्या सरांनी मी मोठा समाजसेवक असल्याचे सांगितले. पण माझ्या छोट्या दोस्तांनो, मी काही फार मोठा माणूस नाही. आपल्या देशात महात्मा फुले, समाजसुधारक आगरकर, बाबासाहेब आंबेडकर यांसारखे फार थोर समाजसेवक होऊन गेले आहेत.
लहानपणी माझी आई मला या समाजसेवकांच्या कथा सांगत असे, तेव्हापासून माझ्या मनात समाजसेवेची ओढ निर्माण झाली. एकदा विनोबांचे आत्मचरित्र माझ्या वाचनात आले. त्यांच्या आईने दिलेला विचार मनात ठसला आणि मी नेहमी दुसऱ्याच्या सुखाचा विचार करू लागलो.
शिक्षण पूर्ण झाल्यावर मी समाजसेवा संस्थेत सामील झालो. अगदी जरुरीपुरते वेतन घेऊन अखंड समाजसेवा करणारी मंडळी येथे एकत्र आली होती. सुरवातीला मला आदिवासी समाजात काम करण्याची संधी मिळाली. नंतर काही वर्षे मी कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत काम केले. मग नंतर काही वर्षे मी शरण आलेल्या दरोडेखोरांच्या वस्तीतही काम केले. सर्व कामगिरीतून मी अनुभवसमृद्ध झालो.
या माझ्या छोट्या मित्रांनो, लक्षात ठेवा आपल्यावर सदैव समाजाचे ऋण असते. ते आपण समाजाची सेवा करून फेडायला हवे. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांतूनच खरे समाधान मिळते. दुसऱ्यांच्या सुखात स्वतः चे सुखसमाधान आहे. या वृत्तीतून जीवन जगलात तर तुमचे जीवन कृतार्थ होईल."
...मराठी निबंध !